
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)।अमरावती शहरात घरफोडी व मंदिर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार गुन्हे शाखा अमरावती शहराच्या पथकाने प्रभावी कारवाई करत मंदिर चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, पोउपनि सागर हटवार व पथकातील अधिकारी-अंमलदार समांतर तपास करीत असताना, पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी गांधी चौक परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे गांधी चौक परिसरातून गोपाल मोहन युवनाते (वय 42, रा. पांढरघाटी, ता. वरूड, जि. अमरावती) यास ताब्यात घेण्यात आले. बारकाईने चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार रामचंद्र युवनाते याच्यासह अमरावती शहरातील पोलीस स्टेशन खोलापुरी गेट व बडनेरा हद्दीत मंदिर चोरी केल्याची कबुली दिली. मात्र त्याचा साथीदार रामचंद्र युवनाते हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून अमरावती शहरातील खालील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी