अकोला : काँग्रेस एनसीपीचं ठरलं, वंचित महायुती वेट अँड वॉच
अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। महायुती तसेच महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्याने कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. जागा वाटपाचा ठोस फार्मूला निश्चित न झाल्यामुळे कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची अ
अकोला : काँग्रेस एनसीपीचं ठरलं, वंचित महायुती वेट अँड वॉच


अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। महायुती तसेच महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्याने कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. जागा वाटपाचा ठोस फार्मूला निश्चित न झाल्यामुळे कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादीही जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अकोल्यात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती.आज महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागा वाटपाचा फार्मूला निश्चित झाल्यानंतरच दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नामांकन अर्ज भरण्याचे शेवटचे केवळ दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस एनसीपी ठरलं..

आगामी महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांची आघाडी निश्चित झाली आहे.. एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या युतीने आघाडी घेतली असून काँग्रेस 80 पैकी 55 जागेवर आपले उमेदवार देणार आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 25 जागांवर लढणार आहे.. तर दुसरीकडे शिवसेना उबठा आणि काँग्रेस यांच्या मैत्री पूर्ण लढत होणार आहे..राजकीय वर्तुळात या लढतीकडे राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून आज आणि उद्या महायुती आणि इतर पक्षाची आघाडी युती स्पष्ट होणार आहे..

महायुतीत चर्चा सुरूच

गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेली अकोला महापालिकेच्या जागा वाटपाबाबतची महायुतीची बोलणी आज पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी दिले आहेत. मात्र, जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.महायुती म्हणून भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का, की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून मैदानात उतरतील, अथवा भाजपला वगळून ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) एकत्र निवडणूक लढवणार — या सर्व शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.जागा वाटपावर अंतिम निर्णय कधी होणार, याकडे महायुतीतील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार डोळे लावून पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande