
कोल्हापूर, 29 डिसेंबर (हिं.स.) - कोल्हापूर महापालिकेतील ८१ जागांसाठी राज्यातील अभूतपूर्व अशी युती झाली आहे. या निवडणुकीत भाजप-३६, शिवसेना-३०, तर राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागा लढवणार असून कोल्हापूर शहरासाठी चौफेर विकास आणि भविष्यकालीन दृष्टी समोर ठेऊन या निवडणुकांना महायुती म्हणून आम्ही सामोरे जात आहोत. प्रत्येक नागरिक, प्रत्येक प्रभाग यांचा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले, ‘‘विकासाच्या सूत्रावर आम्ही ही निवडणूक लढवत असून कोल्हापूर शहर चांगले करून दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.’’ या वेळी भाजप आमदार अमल महाडिक, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तिकिट न मिळाल्याने भाजपच्या एका पदाधिकार्यांनी आत्मदहन करण्याची चेतावणी दिली आहे. त्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर ‘भाजप हा शिस्तीवर चालणारा पक्ष आहे. अनेकांना उमेदवारी हवी होती; मात्र ती देणे शक्य नसते. नाराज झालेल्यांची आम्ही समजूत काढू. भाजप पक्षातील आमदार, खासदार, मंत्री यांच्या नातेवाइकांना तिकीट न देण्याचा निर्णय झाला आहे.’’ असे उत्तर धनंजय महाडिक यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी