डिजिटल अरेस्ट' आणि 'ओटीपी' स्कॅमपासून सावधान!
* सोलापुरात ''नॉकआउट डिजिटल फ्रॉड'' मोहिमेचा शुभारंभ - सायबर सेल आणि बजाज फायनान्सचा नागरिकांना इशारा सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.) : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या व्यापासोबतच सायबर भामट्यांच्या जाळ्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी सोलापूर सायबर क
नॉकआउट डिजिटल फ्रॉड मोहिम


नॉकआउट डिजिटल फ्रॉड मोहिम


* सोलापुरात 'नॉकआउट डिजिटल फ्रॉड' मोहिमेचा शुभारंभ

- सायबर सेल आणि बजाज फायनान्सचा नागरिकांना इशारा

सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.) : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या व्यापासोबतच सायबर भामट्यांच्या जाळ्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी सोलापूर सायबर क्राईम सेल आणि बजाज फायनान्स लिमिटेड सरसावले आहेत. देशातील १०० शहरांमध्ये राबविल्या जाणाऱ्या सायबर सुरक्षा उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापुरात 'नॉकआउट डिजिटल फ्रॉड' ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजीत शाह, सायबर क्राईम अधिकारी प्रांजली काळे, अश्विनी लोणी, सेवानिवृत्त एसीपी सुरेश घाडगे आणि बजाज फायनान्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना, सोलापूर सायबर क्राईमचे पी.आय. श्री. श्रीशैल गजा यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बहुतेक सायबर घोटाळे हे तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव आणि जलद नफा मिळवण्याच्या लोभामुळे होतात. बनावट नोकरीच्या ऑफर, मोफत सुट्ट्यांच्या सहली आणि भेटवस्तूंच्या अमिषाला बळी पडू नका.

कार्यक्रमात वक्तांनी सध्या प्रचलित असलेल्या विविध फसवणुकीच्या प्रकारांची माहिती दिली. यात प्रामुख्याने डिजिटल अरेस्ट, पोलीस किंवा तपास यंत्रणेचे नाव सांगून भीती दाखवणे, बनावट ओटीपी स्कॅम, बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून ओटीपी विचारणे,

सोशल मीडिया स्कॅम, कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या बनावट वेबसाईट आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडणे अशा फसवणुकीचा समावेश आहे.

हा उपक्रम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २०२४ च्या 'फसवणूक जोखीम व्यवस्थापन' मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवला जात आहे. बजाज फायनान्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ग्राहकांची आर्थिक सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून, संशयास्पद लिंक्स, क्यूआर कोड्स आणि अनोळखी ॲप्सपासून दूर राहणे हेच सुरक्षिततेचे मुख्य सूत्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande