
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।
विद्यार्थ्यांनी दिसण्यातून नव्हे तर कामातून आपली ओळख निर्माण करावी. सामाजिक माध्यमांमुळे आज शहर–ग्रामीण अशी भिंत पूर्णपणे कोसळली असून संवादाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन वार्षिक स्नेहसंमेलन ‘उदयोत्सव २०२५–२६’ च्या उद्घाटन समारंभात प्रमुख उद्घाटक म्हणून अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते.
यावेळी व्यासपीठावर म. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, तसेच सदस्य डॉ. श्रीकांत मध्वरे, आडेप्पा अंजुरे, शिवराज वल्लापुरे, भीमाशंकर मुद्दा, भरत पस्तापुरे, दिलीप चौधरी, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. शिवशंकर हल्लाळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. सुरेश लांडगे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना भार्गवी चिरमुले म्हणाल्या, पूर्वी शहरातील विद्यार्थ्यांना अधिक संधी व व्यासपीठ मिळत असे; मात्र आज सोशल मीडियामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही तितक्याच प्रभावीपणे आपले विचार मांडत असून मुंबईतील घडामोडी लातूरमध्ये आणि ग्रामीण भागातील घडामोडी शहरात सहज पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ भाषण ऐकण्यापेक्षा प्रश्न विचारावेत, संवाद साधावा आणि करिअरविषयीच्या शंका मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन करत आलेला पाहुणा ‘बाहेरचा’ न वाटता आपलाच वाटावा यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. करिअर निवडताना कोणतेही काम लहान किंवा कमी लेखू नये, जे काम कराल ते सर्वोत्तम दर्जाचे व मनापासून करा, असा संदेश देताना त्यांनी आपल्या आजोबांनी दिलेला सल्ला तसेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंग सांगत “जे काही कराल, त्यात सर्वोत्तम पाचांमध्ये तुमचे नाव असले पाहिजे,” हा विचार आयुष्यात मार्गदर्शक ठरल्याचे स्पष्ट केले. आजच्या काळात केवळ दिखाऊपणाला महत्त्व नसून कामाची गुणवत्ता आणि समाजासाठी निर्माण होणारे मूल्य अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरासाठी खुलेपणाने आमंत्रित केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी भूतकाळात रममान होण्यापेक्षा वर्तमानात जगावे. आई-वडिलांना स्वाभिमान वाटावा, असे काम प्रत्येक युवकाने करावे, असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis