
सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।
मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप हे सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पण, यंदाच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस, माकप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत लढत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. भाजपच्या दोन्ही ज्येष्ठ आमदारांची नाराजी, पक्षातील इच्छुकांपेक्षा आयारामांनाच संधी देण्याची भूमिका, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घ्यावी लागली. या निवडणुकीत अनेकांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे दिसून आले.
सोलापूर नगरपालिका १८६० मध्ये स्थापन झाली. देशातील सर्वात जुनी नगरपालिका आहे. १९६३ मध्ये महापालिका झाल्यावर सर्वाधिक काळ महापालिकेची सत्ता काँग्रेसच्याच हाती राहिली. पण, मागच्यावेळी महापालिकेवर भाजपची सत्ता आली. आता देखील राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजपला विजयाची खात्री आहे. दरम्यान, या निवडणुकीत सध्या भाजपकडून ११००, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ३५०, शिवसेनेकडून ३०० तर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांकडून सुमारे ७०० उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड