
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सृजनोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
सृजन युवा करंडक द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेने जिंकला, उपविजेतेपद कला शाखेने पटकावले. यावर्षीचा गोल्डन बॉय किताब मयूर वायंगणकर (द्वितीय वर्ष कला) व गोल्डन गर्ल महेश्वरी नांदगावकर (द्वितीय वर्ष कला) यांनी पटकावला.
सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनोत्सवाचे नियोजन करण्यात आले. चॉकलेट बॉय हा किताब सुश्रुत कीर (द्वितीय वर्ष वाणिज्य) व चॉकलेट गर्ल आर्या जाधव (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिने पटकावला. रोझ किंग किताब कुणाल विचारे (द्वितीय वर्ष वाणिज्य) व रोझ क्वीन अवंतिका जुवळे (द्वितीय वर्ष वाणिज्य) यांनी पटकावला.
सृजनोत्सवाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. याचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांच्या हस्ते झाले. यानंतर कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांच्या हस्ते सृजनोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर यांनी प्रास्ताविकातून सृजनोत्सवातील विविध कार्यक्रम व स्पर्धा याची माहिती दिली. उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी सृजनोत्सवमधील कार्यक्रमाचा आढावा घेतला.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, इत्यादी कलाविष्कार सादर केले. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रेयस मेहेंदळे, कार्यवाह धनेश रायकर माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे उपस्थित होते. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर व प्रा. विनय कलमकर यांनी केले. आभार कला विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी