
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.) निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक छापील साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव तसेच छापील प्रतींची संख्या नमूद करणे कायद्याने बंधनकारक असून, या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास थेट कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कारवाईचा फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे तर संबंधित प्रिंटिंग प्रेस मालकांनाही बसणार आहे. निवडणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, पुस्तिका आदी प्रत्येक प्रचार साहित्यावर कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छपाई झाली, कोणी ते प्रकाशित केले आणि किती प्रती छापण्यात आल्या याची स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे. प्रचाराच्या नावाखाली अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा बदनामीकारक मजकूर पसरू नये, यासाठीच निवडणूक आयोगाने हे नियम कठोरपणे अंमलात आणले आहेत. आचारसंहिता उल्लंघनासंदर्भातील तक्रारी नागरिकांना थेट निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे करता येणार आहेत. तसेच ‘CVIGIL’ ऍपद्वारेही प्रचार साहित्याबाबत तक्रार नोंदवता येईल. प्रचारातील मजकुराबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली असून, जात-धर्माच्या आधारावर मतभेद निर्माण करणारा, समाजात तेढ पसरवणारा किंवा विरोधकांची बदनामी करणारा मजकूर छापण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. असा मजकूर आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नाव व प्रतीसंख्या न छापता प्रचार साहित्य छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकाला तुरुंगवास, आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नियमांकडे दुर्लक्ष करून छपाई करणे आता धोकादायक ठरणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन झाल्यास उमेदवारावर आचारसंहिता भंगाची नोंद केली जाऊ शकते. संबंधित खर्च थेट निवडणूक खर्चात धरला जाणार असून, गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांत उमेदवारीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही निवडणूक प्रशासनाने दिला आहे. पत्रकाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य कोणतेही पत्रक, पोस्टर किंवा भित्तीपत्रक लावण्यापूर्वी त्याची एक प्रत संबंधित निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे. ही प्रक्रिया न पाळल्यास तेही आचारसंहिता उल्लंघनात धरले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी