
रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात वाढत्या पर्यटनामुळे नागरी व पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडू लागला असून, क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक दाखल होत असल्याने अनेक पर्यटनस्थळांवर कोंडमाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, पार्किंग आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.
अलिबाग, मुरुड, काशिद, नागाव, मांडवा, किहीम, आवास, आक्षी, रेवदंडा ही ठिकाणे गेल्या काही वर्षांत “न्यू इअर डेस्टिनेशन” म्हणून नावारूपास आली आहेत. मुंबईपासून जवळचे अंतर, निवास व भोजनाच्या मुबलक सुविधा यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक रायगडमध्ये दाखल होतात. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असला, तरी दुसरीकडे नागरी सुविधांवर ताण वाढत आहे.गेल्या चार दिवसांत अलिबाग व मुरुड तालुक्यात दीड ते दोन लाख पर्यटकांनी हजेरी लावली. तसेच माथेरान, दिवेआगर, हरिहरेश्वर व श्रीवर्धनही पर्यटकांनी गजबजून गेले. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अलिबाग शहरात हॉटेल्स, वाहतूक व पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला. अरुंद रस्त्यांवर वाहनांची गर्दी, पार्किंगचा प्रश्न आणि निवासाच्या शोधात पर्यटकांची भटकंती पाहायला मिळाली.
पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना रस्ते, पाणी, वीज, पार्किंग व सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विकास मात्र अपेक्षित प्रमाणात झालेला नाही. ग्रामपंचायती व नगरपालिकांचे उत्पन्न मर्यादित असल्याने या सुविधा विकसित करणे त्यांना अवघड ठरत आहे.दरम्यान, रायगड जिल्ह्यातील ५९ गावांसाठी २४३ कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार असूनही अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. वाढत्या पर्यटनाचा विचार करता राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखून पर्यटनपूरक पायाभूत विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके