
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।खरोसा व परिसरात बिबट्या आढळल्याच्या अफवा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व तोंडी चर्चेत पसरत असून, यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या सर्व बातम्या पूर्णपणे अफवा असून त्याला कोणताही अधिकृत आधार नाही, अशी स्पष्ट माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वन विभागाच्या पथकाने खरोसा व आजूबाजूच्या शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली असता बिबट्याच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे, पगमार्क्स किंवा हालचाली आढळून आलेल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.काही व्यक्तींनी सोशल मीडियावर जुने किंवा अन्य ठिकाणचे व्हिडीओ, फोटो शेअर करून बिबट्या आढळल्याचा दावा केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.
कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास थेट वन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, मात्र खात्रीशिवाय संदेश, फोटो किंवा व्हिडीओ फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis