
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)।पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक अर्ज करतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. पण मंगळवारी अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र मिळेलच याची खात्री नाही असे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी आज सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. आत्तापर्यंत केवळ ४८ जणांचे अर्ज दाखल केले आहेत. पण पुढील दोन दिवसात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला ४१ विभागांची एनओसी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने https://nocelection.pmc.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर अर्ज केल्यानंतर ४१ विभागांना एकाच वेळी अर्ज उपलब्ध होणार असून, त्यानंतर काही वेळात एनओसी उपलब्ध होऊ शकणार आहे. ३० डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्याच्या दोन तास आधीपर्यंत म्हणजे दुपारी १२ वाजेपर्यंत एनओसी अर्ज दाखल करता येणार आहे. पण पुढील दोन तासात एनओसी प्राप्त न झाल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार असतील असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु