
जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला असून, आता या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राजकीय वरदहस्त असलेल्या आणि आर्थिक संपन्न असूनही देयके न भरणाऱ्या ‘बड्या’ थकबाकीदारांची नावे आता सार्वजनिकरीत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महावितरणतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. जळगाव परिमंडलात सध्या थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता सुमारे साडेसहा लाख लघुदाब ग्राहकांकडे महावितरणची 1103 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात जळगाव जिल्ह्यात 556 कोटी 53 लाख, धुळे जिल्ह्यात 322 कोटी 10 लाख व नंदुरबार जिल्ह्यात 224 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ग्राहकांनी वर्षभरापासून एक रुपयाचाही भरणा केलेला नाही. यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.मुजोर ग्राहकांविरोधात थेट पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याच्या सूचना महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी परिमंडलातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत.तर वीजबिलासाठी रांगेत उभे रहायची गरज नाही.. गेल्या काही वर्षांत ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईल ऍप्सवरील फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई आता पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांना थकित विजबिल भरण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत असते. मात्र, तरीदेखील थकबाकी न भरणाऱ्या जळगाव परिमंडलातील सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मात्र हे ग्राहक लागलीच पैशांची जमवाजमव करून, काही तासांत वीजबिल भरतात. त्यानंतर पुन्हा महावितरणचे कर्मचारी या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करत आहेत.जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक धनवान व्यक्तींकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत आहे. मात्र, वीजबिल भरण्याबाबत नोटीस बजावूनही संबंधितांकडून दाद दिली जात नाही. अशा ग्राहकांकडे महावितरणचे कर्मचारी कारवाईसाठी गेल्यावर राजकीय वजन वापरून कारवाई टाळण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या बड्या थकबाकीदारांची नावे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. वृत्तपत्रांतून नावे प्रसिद्ध केल्यावर या थकबाकीदारांना ऐन निवडणुकीच्या वेळेस सामाजिक स्तरावरही चपराक बसणार आहे. अलिकडेच महावितरणने मनपा प्रशासनाला पत्र देऊन उमेदवारांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर