
जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने अखेर आपला पत्ता उघड केला असून, जागावाटपाचा महत्त्वपूर्ण निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, भाजप-शिवसेना महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. जळगाव मनपाच्या एकूण ७५ जागांसाठी ‘३८-३७’ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की, हे जागावाटप दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये निश्चित झाले असले तरी, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. संबंधित पक्षप्रमुख आपल्या वाट्याच्या जागांतून मित्रपक्षांना जागा सोडतील. लहान पक्षांशी चर्चा सुरू असून, आवश्यकतेनुसार जागांमध्ये फेरबदल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उमेशदादा पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, महानगरप्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून ताणतणाव सुरू असताना, महाविकास आघाडीने जागांचा फॉर्म्युला जाहीर करून निवडणूक रणांगणात आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या नव्या समीकरणामुळे जळगावच्या राजकारणात आता थेट आणि रंगतदार लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर