
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या प्रांगणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सभेस संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष उदय घुगे, सहचिटणीस दिंगबर गिते यांच्यासह विश्वस्त, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षात दिवंगत झालेले मान्यवर व सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या एकूण कामकाजाची माहिती देत चालू शैक्षणिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संस्थेचा सन २०२४–२५ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करण्यात आला. तसेच सन २०२४–२५ या आर्थिक वर्षातील मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांचे उत्पन्न-खर्च पत्रक व ताळेबंदास मंजुरी देण्यात आली. एकत्रित अंदाजपत्रकासही सभेची मान्यता देण्यात आली. सभेत प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये सभासदांच्या वारसांना सभासदत्व देणे व संचालक मंडळाची संख्या कमी करणे या मुद्द्यांचा समावेश होता. विषय क्रमांक एक अंतर्गत जवळपास सर्वच सभासदांनी आपल्या पत्रांद्वारे व सूचनांमधून मूळ सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याची गरज व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत अनेक मूळ सभासद दिवंगत झाल्याने त्यांच्या वारसांना सभासदत्व देण्यासाठी स्पष्ट निकष व निश्चित पद्धत ठरवावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील प्रक्रिया व नियमावली पुढील बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV