
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
महानगरपालिकेच्या निवडणूकीत महानगरवासीयांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करावी, राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून भाजप परभणी महानगराचा निश्चितपणे चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव सचिन अंबिलवादे आदी व्यासपीठावर विराजमान होते.
याप्रसंगी महानगरांतर्गत व्यापार्यांसह उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विकासात्मक कामांसह नागरी सुविधांसंदर्भात काही मोलाच्या सूचना केल्या. विशेषतः महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेच्या कोलमडलेल्या आर्थिक स्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. महापालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर कर वसूली होते. सर्वसामान्य नागरीक इनामे इतबारे हे आव्वा की सव्वा कर अदा करत आले आहेत. दुर्देवाने शंभर टक्के कर अदा करणार्या वसाहतींना नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. रस्ते, नाल्या, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न भयावह आहेत. पथदिवे, नियमित पाणी पुरवठा, शहर वाहतूकीची जटील समस्या, बेसुमार अतिक्रमणे वगैरे प्रश्न उभे आहेत. त्याबद्दलसुध्दा मनपा प्रशासनाद्वारे काडीमात्र कारवाई होत नाही, अंमलबजावणी केली जात नाही, असा सूर व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी हे नागरी प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रात प्राधान्याने समाविष्ट आहेत, ते प्रश्न निश्चित मार्गी लागावेत, या साठी पक्ष प्रयत्नशील राहील, असे नमूद केले. तर माजी मंत्री वरपुडकर यांनी विकासात्मक कामे असो, किंवा नागरी प्रश्न हे प्राधान्याने सुटलेच पाहिजेत, त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरघोस असा निधी प्राप्त झाला पाहिजे, सुदैवाने राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. निश्चितच त्यांच्या माध्यमातून महानगरासमोरील मोठी विकासात्मक कामे व नागरी सुविधांची कामे तरतूद उपलब्ध करीत मार्गी लावली जातील, असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपल्या भाषणातून प्रत्येकाच्या भावनांची आपण निश्चित दखल घेऊन, असा विश्वास प्रगट करतेवेळी महानगरासमोर अनेक जटील प्रश्न आहेत. परंतु, ते प्रश्न सहजपणे सुटूही शकतात, कारण राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. हे सरकार सदैव सकारात्मक दृष्टीकोन अवलंबून विकासात्मक कामे करीत आहे. परभणी महानगरवासीयांच्या रास्त अपेक्षासुध्दा निश्चितच मार्गी लागतील, त्यासाठी परभणीकरांचा आशिर्वाद, भक्कम ताकद जरुरी आहे, त्या बळावरच आपण राज्य व केंद्रात सातत्याने पाठपुरावा करीत भूमीगत गटार योजना, मलनिस्सारण योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सुधारित पाणी पुरवठा योजनेसह अन्य महत्वाकांक्षी योजना लार्गी लावू, विजेच्या बाबतीत पुढील 50 वर्षांचे नियोजन झाले आहे. तो संवेदनशील प्रश्नसुध्दा लवकरच मिटेल, अंडरग्राऊंड वीज पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली. नवीन औद्योगिक वसाहत, बेरोजगारांसाठी आयटी पार्क, भक्कम असे रस्ते, नाट्यगृहाचे पुनर्जीवन, उभारणी, कचरामुक्त, धूळमुक्त शहर, सुरळीत अशी वाहतूक वगैरे प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू, असा विश्वासही व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis