
रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरणामार्फत तीन ग्रामपंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळण्याऐवजी आज त्यांचे आरोग्यच धोक्यात आले असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. या प्रकल्पाचा वापर सध्या केवळ नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात येत असून, जमा होणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया न करता तो थेट डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जात आहे. याचा थेट फटका कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील डम्पिंग ग्राउंडवर वारंवार कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार घडत असून, या आगीतून निर्माण होणारा दुर्गंधीयुक्त व विषारी धूर कोल्हारे, दामोते, बोपले तसेच उल्हास नदीपलीकडील परिसरात पसरतो. या धुरामुळे लहान मुले, वृद्ध, महिला तसेच दमा व श्वसनविकार असलेल्या रुग्णांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी व उलट्यांचे त्रास होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करावे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी कळकळीची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात सीईओंना लेखी निवेदन देण्यात आले.
डम्पिंग ग्राउंडमध्ये संध्याकाळच्या वेळी जाणीवपूर्वक कचरा जाळला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपात कचरा खड्ड्यात टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी हा उपाय अपुरा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरपंच महेश विरले, रोशन संजय मस्कर आणि सोमनाथ विरले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांच्या समवेत प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडची पाहणी करण्यात आली .
नेरळ विकास प्राधिकरणाकडून कचऱ्यावर कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया न केल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असून, प्रशासनाने मानवी आरोग्य्हिताचा विचार करून तातडीने ठोस व कायमस्वरूपी निर्णय घ्यावा, अशी भावनिक व तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके