
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। : गिरीश महाजनांकडून रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा आढावा सुरू होता. नाशिकमधील हमखास निवडून येणाऱ्या जागांवर विशेष मंथन झाले असून, आजच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. भाजपचे प्रभावी नेते आणि पक्षातील संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांच्यासाठी नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली लढाई मानली जात आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवणे हे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत निवडणूक आढावा बैठक घेतली. या बैठकीत हमखास निवडून येणाऱ्या जागांवर विशेष मंथन करण्यात आले. या बैठकीत काही प्रभागांमधील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, नाशिकमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज आणि उद्या शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यात राष्ट्रवादीचेही अजून काही ठरत नाही. भाजपाने शंभर प्लसचा नारा दिला असून प्रारंभी महायुतीचे शंभर प्लस म्हणत असले तरी ऐनवेळी भाजपा स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गुन्हाळ अजून काही संपण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज गिरीश महाजन यांच्याकडून युतीबाबत काही ठोस घोषणा होणार का? याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राजकीय हालचाली पाहता नाशिकमध्ये भाजप, शिंदे गटाची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे बंधूची शिवसेना-मनसे युती व काँग्रेस अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेची राजकीय गणिते जुळलीच तर शिवसेनेला बरोबर घेऊन भाजप लढेल. ठाकरे बंधू हे काँग्रेसला बरोबर घेऊन लढतील, असे बोलले जात आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV