
कोणाचीही असो लाट, राष्ट्रवादीच अडवणार वाट! लातूर महापालिकेत राष्ट्रवादी ठरणार 'किंगमेकर'!
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंगमेकरची ठरणार असून, राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय कोणालाही सत्तेचा सोपान चढता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. लातूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख बळवंत जाधव, सुनील बसपुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
युती की स्वबळ?:
महायुतीसाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, मात्र तसे न झाल्यास 'स्वबळावर' लढण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शवली.
इलेक्टिव्ह मेरिटवर भर: केवळ निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल, असा स्पष्ट संकेत त्यांनी दिला.
जुने-नवे समन्वय: नवीन आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून जुन्या-जाणत्यांच्या सोबतीने पक्षाची ताकद वाढवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवनवीन कार्यकर्त्यांचा ओढा वाढत आहे. शहरात पक्षाची ताकद वाढवून आम्ही महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.— बाबासाहेब पाटील, मंत्री
व्यासपीठावरील उपस्थिती
यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे, ॲड. बळवंत जाधव, शहराध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis