रायगड : एमएसआयडीसी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह
शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना धडक देण्याचे संकेत रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते कामांच्या निकृष्ट दर्जा व अपूर्णतेबाबत शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या महत्त्
एमएसआयडीसी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह; शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना धडक देण्याचे संकेत


शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना धडक देण्याचे संकेत

रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते कामांच्या निकृष्ट दर्जा व अपूर्णतेबाबत शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामावरून पक्ष आक्रमक झाला आहे.

चांगले व सुसज्ज रस्ते देण्याच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधी रुपयांची उधळण होत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना धुळीचे साम्राज्य आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शेकापकडून करण्यात आला आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला आहे.अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून अनेक ठिकाणी खड्डे खोदून कामे अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड हा रस्ता तालुक्यातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून अवजड वाहनांसह शेकडो वाहने दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात. मुख्य रस्त्यांना जोडणारा हा मार्ग पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आला होता; मात्र स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता केलेले काम काही दिवसांतच बंद पडले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम ठप्प असल्याने संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा व श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबांवर याचा थेट परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सुरेश घरत यांनी संताप व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसून, मागण्या मान्य न झाल्यास शेकापकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande