
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)।
पुणे- मनमाड लोहमार्ग हा व्यस्त मार्ग असून, यावरून प्रवासी व माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. परिणामी रुळांची झीज लवकर होते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता त्या मार्गावर ५५० जीएमटी (ग्रॉस मिलियन टन) क्षमतेचे नवीन रूळ टाकण्याचे काम सुरू केले आहे.हे रूळ उच्च दर्जाचे असून, त्यांची क्षमता ५५ कोटी टन वजनाची वाहतूक सहन करण्याची असणार आहे. नव्या रुळांमुळे प्रवासी सेवा अधिक गतिमान व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.पुणे रेल्वे विभागात सध्या पुणतांबा - कन्हेगाव या स्थानकादरम्यान रूळ बदलण्याचे काम वेगात सुरू आहे. यासाठी पीक्यूआरएसचा (प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम) वापर केला जात आहे. याच्या मदतीने ३५ दिवसांत नऊ किलोमीटरच्या अंतरातील रूळ बदलण्यात आले आहेत.रेल्वे वाहतूक सुरू ठेऊन ठरावीक काळात ब्लॉक घेत हे काम केले आहे. उच्च क्षमतेच्या रूळांमुळे या मार्गावर आता किमान १५ ते २० वर्षे रूळ बदलण्याची आवश्यकता नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु