
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : नऊ वर्षे रिकाम्या असलेल्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आज (२९ डिसेंबर) विराजमान झाल्या. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
या विशेष सोहळ्याला रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला संघटक कांचन नागवेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर आणि भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
नवनियुक्त नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सौ. सुर्वे म्हणाल्या की, रत्नागिरी शहरासाठी अपेक्षित असणारी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करणे आणि नागरिकांच्या हिताचे उत्तम काम करणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. सर्वांना सोबत घेऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी