
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे श्रीमद् भागवत महापुराण कथेचे कथा सूत्र प्रतिपादन करताना स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी वेदांचे महत्त्व विशद केले. वेदांचे पालन आणि रक्षण करणारा मनुष्य आजीवन सुरक्षित राहू शकतो, असे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
बालियापांडा येथील इंद्रद्युम्ननगरीमध्ये १ जानेवारी २०२६ पर्यंत चालणाऱ्या या कथा सोहळ्याचे आयोजन राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. स्वामीजींनी आपल्या प्रवचनात कौरव आणि पांडवांच्या वंशाचा संदर्भ दिला. अस्त्रांचा प्रयोग मंत्रांच्या साहाय्याने कसा केला जात असे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. वेदांच्या माध्यमातूनच भारतीय ऋषीमुनींच्या शक्तीची महत्ता लक्षात येते, असेही त्यांनी नमूद केले. जे काही इष्ट आहे ते सुंदरच वाटले पाहिजे, असा विचार त्यांनी या वेळी मांडला.
अध्यात्म आणि ईश्वरी चिंतनावर भाष्य करताना स्वामीजी म्हणाले की, प्रत्येकाने प्रभूच्या चरणकमलांचे चिंतन केले पाहिजे. कथेमध्ये चरणकमलांच्या कोमलतेचे विशेष वर्णन येते. चित्तामध्ये कोमलता असल्याशिवाय अध्यात्म घडू शकत नाही आणि अशा कोमल चित्ताशिवाय भगवंताचे आगमनही होत नाही. प्रभूच्या करकमलांमध्ये चक्र असून त्यांच्या आयुधांचे चिंतन केल्याने कोणाच्या आयुष्यात काहीही बिघाड होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भगवंताच्या मुखारविंदावरील अनुकंपा आणि त्यांच्या नेत्रांमधील अखंड करुणा भाव भक्ताला शांतता प्रदान करतो. याच अनुकंपेमुळे जगन्नाथ भगवान साऱ्या संसाराचे भरण-पोषण करत असतात. संतांच्या सान्निध्यात राहून जेव्हा आपले चिंतन परमात्म्याशी एकरूप होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने मनुष्याचे स्वरूप बदलत जाते, असे स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबीत पात्रा, ओडिशा भाजपचे कोषाध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. सूत्रसंचालन कांचन बाहेती यांनी केले. या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती.
▫️
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis