
जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी आज जळगाव महानगरपालिकेमध्ये मोठी गर्दी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर अर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.जळगावसह महाराष्ट्रातमधील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया सुरू असून ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तर अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. अर्ज भरण्यासाठी आता अवघे ४८ तासांचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आज सकाळपासून गर्दी केली.दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून मात्र अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एक मत झाले नाही. मात्र अनेक उमेदवार कालावधी कमी असल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अर्जाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. जळगाव शहर पोलिसांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेड्स लावून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केवळ उमेदवार आणि मोजक्याच व्यक्तींना आत प्रवेश दिला जात असून, गर्दीला प्रवेशद्वाराबाहेरच थोपवण्यात आले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर