
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची शपथ देण्यात आली.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्याची सामूहिक शपथ घेतली. या शपथेचे वाचन नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या केंद्राध्यक्ष, तसेच अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कला मंदिर व पंचवटी येथील
सदाशिव भोरे नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रांमध्ये सकाळ व दुपार सत्रात सह जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजीत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन तहसीलदार रामजी राठोड, सुनीता जराड व पंकज पवार यांनी केले होते. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, नितीन पवार यांनी संपूर्ण प्रशिक्षण सत्रांचे नियोजन केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, 'आम्ही
भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचे पावित्र्य राखू तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, धर्म-वंश-जात भाषा आदींच्या प्रभावाखाली न येता मतदान करू' अशी शपथ घेत जय हिंद, जय भारत असा जयघोष केला. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी या प्रतिज्ञेचे अनुकरण प्रत्येक भारतीय नागरिक व प्रत्येक मतदाराने करावे, असे आवाहन केले. तसेच मतदार जनजागृती अभियान अधिक व्यापक करण्यासाठी सर्वसार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशी प्रतिज्ञा घेण्यात यावी, असे आवाहन उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV