
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे अमृत पेरण्याची ताकद युवकांमध्ये निर्माण झाली, तरच खऱ्या अर्थाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होईल, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित इंद्रधनु युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, देशात शेती हळूहळू संपवली जात असून शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्याचवेळी जात आणि धर्माच्या नावावर जाणीवपूर्वक समाजात दुही माजवली जात असून धार्मिक द्वेषाचे विष पेरले जात आहे. ते विष मनात उतरू देऊ नका आणि ते पसरवणाऱ्या शक्तींना थारा देऊ नका.
यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. संजय गवाळे, नवनिर्माण हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख सुकुमार शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख ताराचंद ढोबळे, जी. एस. ऋतिक चव्हाण आणि विधी कापडी उपस्थित होते.
उल्का महाजन यांनी युवकांनी आपल्या आजूबाजूच्या विविध उद्योगांचा आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोकणचा विकास खऱ्या अर्थाने विकासाकडे जात आहे की विनाशाकडे, याची सजग जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी लोटे येथील प्रस्तावित विनाशकारी प्रकल्पांकडे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शांताताई या कष्टकरी महिलेने सावकारशाहीच्या शोषणाविरोधात पुकारलेल्या बंडाचा उल्लेख करत त्यांनी ४० जोडप्यांना वेठबिगारीतून मुक्त केल्याचे उदाहरण दिले. प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे नदीनाले, पर्यावरण आणि निसर्गाचा नाश होत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानातील मूल्ये आणि अधिकार राबवण्यासाठी आजची पिढी सजग नसेल, तर देश पुन्हा गुलामगिरीकडे ढकलला जाण्याचा धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. मोठ्या कष्टाने आणि विविध धर्मांच्या सहभागातून साकार झालेले संविधान आज धोक्यात असून त्याच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी चावडी फातिमा सावित्री या महिलांचे आवाज बुलंद करणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
प्रास्तविक प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी केले. त्यांनी डॉ. उल्का महाजन यांची ओळख करून देताना आदिवासी, कष्टकरी आणि असंघटित कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी उभा केलेला संघर्ष आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या सत्यनिष्ठ कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी इंद्रधनू युवा महोत्सवाची कर्तृत्ववान महिलाच्या हस्ते उद्घाटन करण्याची आणि वैचारिक प्रबोधन देण्याची दीर्घ परंपरा याची माहिती दिली. हा महोत्सव केवळ कलाविष्काराचा नसून वैचारिक जागरचा आहे असे ते म्हणाले. यावेळी मान्यवराच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी