
सातारा, 29 डिसेंबर (हिं.स.) - सातारा येथील शाहू स्टेडियम येथे होत असलेल्या ९९ अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मंडप उभारणी आता अंतिम टप्प्यात आहे. यात मुख्यत्वेकरून मुख्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी संमेलन कट्टा, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्टेडियमची मोठी जागा आणि परिसरातील अन्य जागा ही वाहनतळासाठी वापरण्यात येणार आह. सातार्यातील हे चौथे संमेलन असून ते ३२ वर्षांनी सातार्यात होत असल्याने मराठी रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ९९ विद्यार्थी सादर करणार महाराष्ट्र गीत !
महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास यांची महती गाणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत उद्घाटन सोहळ्यात ९९ विद्यार्थी सामूहिकरित्या गाणार आहेत. या उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील २५ शाळांमधून ८ वी ते १२ वीतील ९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचा बोधचिन्हाचा फुगा आकाशात !
संमेलनाच्या प्रचारासाठी संमेलनाचे बोधचिन्ह असलेल फुगा सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथून सोडण्यात आला. या प्रसंगी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यंसह अन्य उपस्थित होते. नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, ‘‘शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान सातार्याला मिळाला आहे. स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या सिद्धतेला गती आली आहे. आता सोडलेला फुगा सातारा शहरातील कुठल्याही स्थानातून दिसू शकणार आहे.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी