
रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणारे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे आगरी समाजातील पहिले शहिद हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रायगडचा युवक फाउंडेशनच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश शहिद हिराजी पाटील यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याची ओळख आगरी समाजातील तरुण-तरुणी, शालेय विद्यार्थी व समाज बांधवांना करून देणे हा आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा इयत्ता ५वी ते ७वी, ८वी ते १०वी, ११वी ते १५वी तसेच खुला गट अशा चार विभागांत घेण्यात आली होती. निबंधांचा विषय शहिद हिराजी पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारित होता.
प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक ₹५०१, द्वितीय ₹३००, तृतीय ₹२०० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आर.सी.एफ. माध्यमिक विद्यालय, कुरुळ, जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि जे.एस.एम. कॉलेज येथील सुमारे ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून सहभागी विद्यार्थी व पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अलिबागमधील देशप्रेमी नागरिकांनाही कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. बक्षिसे व प्रमाणपत्रे कार्यक्रमस्थळी त्वरित वितरित केली जाणार असून, नंतर दिली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके