
रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। राज्य सरकारची '१०८' रुग्णवाहिका योजना रायगड जिल्ह्यात उत्तमरीत्या कार्यरत असून सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सुरू केलेल्या या सेवेत २०१४ पासून आतापर्यंत २ लाख ५५ रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळाले आहेत.
याच सेवेमुळे अपघातग्रस्त, भाजलेले, हृदय आजाराने त्रस्त, विषबाधा, जखमी, गर्भवती महिला तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांसह विविध आपत्तीत अडकलेल्या रुग्णांना मदत मिळाली आहे. यातील ८ हजार ४०९ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर भांडणात जखमी १ हजार ८ जणांनाही मदत झाली. ९०२ भाजलेल्या रुग्णांना, २ हजार २३५ हृदयरुग्णांना तातडीने उपचार मिळाले. विषबाधा झालेल्या ५ हजार ९४ रुग्णांना मदत करण्यात आली तर प्रसूतीसाठी २४ हजार ६५४ महिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवले गेले.
याशिवाय, पॉली ट्रामाच्या ६ हजार २६४ आणि आत्महत्येचा प्रयत्न करणा-या १४१ नागरिकांना १०८ रुग्णवाहिकांनी वाचवले. रायगड जिल्हा व्यवस्थापक जीवन काटकर यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २३ रुग्णवाहिका उपलब्ध असून त्यापैकी ४ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि १९ बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असलेल्या रुग्णवाहिका आहेत.
'१०८' रुग्णवाहिका मोफत सेवा देते आणि वेळेवर उपचार मिळवून देत असल्याने ती नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. मात्र अजूनही रुग्णवाहिकांची गरज आहे, तसेच तातडीच्या रुग्णांना मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यास बोट अॅम्ब्युलन्सची आवश्यकता आहे.
या सेवेमुळे रायगडमधील हजारो रुग्णांचा जीव वाचला असून, तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके