
अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या रणसंग्रामात पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहम्मद नौशाद शेख आणि त्यांच्या समर्थकांनी साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला काळा फासल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपमध्येही असंतोष उफाळून आला आहे. भाजपचे महानगरप्रमुख तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांची उमेदवारी अर्ज कापल्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आक्रोश केला.
“आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, पक्षासाठी खूप काम केलं, मात्र तिकीट नाकारलं,” असा आरोप करत कार्यकर्ते भावूक झाले. प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती विभागातून किशोर मानवटकर यांना तिकीट दिल्याने हा रोष वाढला. या गोंधळात विजय अग्रवाल यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सिव्हिल लाईन पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे