अकोला : भूजल स्त्रोत नकाशांकनाविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन
अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। केंद्रीय भूजल मंडळाच्या वतीने ‘भूजल स्त्रोत माहिती, उपयोग व नकाशांकन’ या विषयावरील कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. भूजलस्त्रोत नकाशांकनातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा शाश्वत जलनियोजनासाठी प्रभावी वापर करता यावा, य
P


अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। केंद्रीय भूजल मंडळाच्या वतीने ‘भूजल स्त्रोत माहिती, उपयोग व नकाशांकन’ या विषयावरील कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. भूजलस्त्रोत नकाशांकनातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा शाश्वत जलनियोजनासाठी प्रभावी वापर करता यावा, यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, जलसंधारण विभागाचे डॉ. अमोल डी. मस्कर यांच्यासह मृद व जलसंधारण, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे, जि. प. पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कृषी विभागातील विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय भूजल मंडळाने सखोल भूजल अहवाल तयार करून सुलभ डेटा पोर्टल्स विकसित केली आहेत. जलसंपदा व्यवस्थापनासाठी ती निश्चित उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री. मालठाणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक नियोजन व शाश्वत व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी या डेटाचा व जलसाठे नकाशांकन अभ्यासाचा सक्रियपणे वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

तज्ज्ञ हितेश रामटेके यांनी कार्यशाळेचे बीजभाषण केले. यानंतर शास्त्रज्ञ निर्मलकुमार नंदा यांनी अकोला जिल्ह्याच्या राष्ट्रीय जलस्त्रोत नकाशांकन अभ्यासाचे सविस्तर सादरीकरण केले. या सादरीकरणात भूजलसाठ्यांची वैशिष्ट्ये, भूजल क्षमता, पाण्याच्या गुणवत्तेचे पैलू आणि व्यवस्थापन धोरणे यांचा समावेश होता.

यावेळी त्यांनी ऑनलाइन डेटा प्लॅटफॉर्म्स—भूजल डेटा डाउनलोड पोर्टल यांची थेट प्रात्यक्षिके सादर करून त्याचा विविध विभागांकडून नियोजन, अंमलबजावणी व जलसंबंधित योजनांच्या देखरेखीकरिता कसा उपयोग करता येईल, हे स्पष्ट केले.

कार्यशाळेदरम्यान अकोला जिल्ह्याचा राष्ट्रीय जलस्त्रोत नकाशांकन अहवाल, तसेच कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा यांचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. भूजल पुनर्भरण व व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचे दस्तऐवजीकरण व प्रसार करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होईल.

श्री. कराड यांनी राज्य शासनाच्या विभागांकडून भूजलाधारित प्रकल्प, जलसंधारण व सिंचन नियोजनाच्या टप्प्यावर तज्ज्ञांचे अहवाल व डेटासेट्स कसे प्रभावीपणे वापरता येतील, याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी संवाद सत्र घेण्यात आले. सहाय्यक भूजलशास्त्रज्ञ प्रकाशचंद्र महाराणा यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विविध विभागांतील एकूण ६७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande