जळगाव - ९१ जण १५ दिवसांसाठी हद्दपार; इच्छुक उमेदवारांचाही समावेश
जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.) जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण होता पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे अॅक्शन मोडवर आले आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांविरुद्ध प्रतिबंधात्म
जळगाव - ९१ जण १५ दिवसांसाठी हद्दपार; इच्छुक उमेदवारांचाही समावेश


जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.) जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण होता पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे अॅक्शन मोडवर आले आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश काढत त्यांना तब्बल १५ दिवसांसाठी महापालिका क्षेत्राबाहेर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० जणांवर करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आधीच सखोल नियोजन केले असून उपद्रवी, सराईत गुन्हेगार आणि संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारी टोळ्यांवर धडक कारवाई, तसेच प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी सुरू आहे. याच अनुषंगाने दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांची यादी तयार करून त्यांच्यावर एकतर्फी हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, या हद्दपारीच्या यादीत काही इच्छुक उमेदवारांचाही समावेश असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावरही ही कारवाई अटळ मानली जात आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील काही चेहरे पोलिसांच्या थेट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर आणखी कडक कारवाई होण्याचे संकेतही पोलिसांकडून देण्यात आले आहेत.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी महापालिका परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका इमारत आणि परिसरात तिहेरी सुरक्षेचे कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. १७ मजली इमारतीच्या पायथ्याशी, मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच इमारतीच्या आत मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात राहणार आहेत. या बंदोबस्तासाठी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आरसीपीच्या दोन तुकड्या आणि मुख्यालयातील पोलिस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असून, संपूर्ण शहरात कडक नजर ठेवली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande