
रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। मोबाईल, व्हिडीओ गेम्स आणि डिजिटल स्क्रीनच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीसमोर भारतीय खेळसंस्कृती आणि शिवकालीन पराक्रमाचा थेट अनुभव देणारे एक वेगळेच चित्र कुरुळ येथे पाहायला मिळाले. सुएसो माध्यमिक विद्यालय, कुरुळ येथे मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रदर्शनाने इतिहास हा केवळ अभ्यासक्रम नसून जीवनाला दिशा देणारी ऊर्जा आहे, हे प्रभावीपणे अधोरेखित केले.
“आपला कट्टा”, नवी मुंबई या संस्थेच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमात भारतातील पुरातन बैठ्या खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हे खेळ केवळ करमणुकीपुरते मर्यादित नसून त्यामागे युद्धतंत्र, सांघिक निर्णयक्षमता, शारीरिक व मानसिक शिस्त तसेच स्वसंरक्षणाची जाणीव दडलेली आहे, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले. इतिहासात गडकिल्ल्यांवर, लेण्यांत आणि रणांगणात योद्धे घडवणारे हेच खेळ आज नव्या पिढीला आपल्या मुळांकडे घेऊन जाण्याचे कार्य करत असल्याचे चित्र दिसून आले.
प्रदर्शनात शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे, ऐतिहासिक नाणी तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे मांडण्यात आली होती. ही साधने पाहताना अनेक विद्यार्थी भारावून गेले. इतिहासाच्या पुस्तकातील पाने जणू लोखंड, दगड आणि छायाचित्रांच्या रूपाने जिवंत झाल्याचा अनुभव उपस्थितांना मिळाला.
या उपक्रमातून “इतिहास पाहायचा नाही, तो जगायचा असतो” हा संदेश ठळकपणे पुढे आला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
यावेळी बोलताना ॲड. प्रसाद पाटील, अध्यक्ष, स्थानिक व्यवस्थापन समिती, सु ए सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ यांनी सांगितले की, “आपली परंपरा, खेळसंस्कृती आणि शिवकालीन शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले, तरच सक्षम आणि राष्ट्राभिमानी समाज घडेल.” डिजिटल युगात इतिहासाची मशाल पेटवणारा हा उपक्रम कुरुळसह संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके