रायगड - सामान्य पोस्टमनची मुलगी झाली सीए
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। हनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, हे नेरळ (ता. कर्जत) येथील सायली सुनीता बाळकृष्ण दाभणे हिने सिद्ध करून दाखवले आहे. सायलीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्व
रायगड - सामान्य पोस्टमनची मुलगी झाली सीए


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। हनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, हे नेरळ (ता. कर्जत) येथील सायली सुनीता बाळकृष्ण दाभणे हिने सिद्ध करून दाखवले आहे. सायलीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून आपल्या कुटुंबासह संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे.

सायलीचे वडील बाळकृष्ण दाभणे हे भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. साध्या आर्थिक परिस्थितीतून येऊनही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ दिले. आई सुनीता दाभणे यांनीही घरची जबाबदारी सांभाळत सायलीच्या अभ्यासासाठी आवश्यक ते सहकार्य केले.

सायलीने प्राथमिक ते उच्च शिक्षण अत्यंत कष्टाने पूर्ण केले. सीए परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेक अडचणी आल्या, मात्र हार न मानता तिने सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. मर्यादित साधनसामग्री असूनही योग्य नियोजन, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले.

आपल्या यशाबद्दल बोलताना सायली म्हणाली, “आई-वडिलांचा विश्वास आणि पाठिंबा हाच माझा खरा आधार होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठी ठेवली आणि मेहनत केली तर यश नक्की मिळते.” सायलीच्या या यशामुळे नेरळ व कर्जत तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी, प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande