
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। भाजपने उमेदवारी निश्चित करताना अनेक प्रयोग केले आहेत. अनेक माजी नगरसेवकांना घरी बसवले, आमदार, खासदारांच्या नातेवाइकांना कात्री लावली. पण त्याचसोबत अनेक तरुण व नव्या चेहऱ्यांना महापालिकेसाठी संधी दिली आहे. विशेष म्हणजे खुल्या जागांवरही महिलांना प्राधान्य देऊन विरोधकांमधील पुरुषांपुढे आव्हान निर्माण केले आहे. हा बदल कितपत यशस्वी होणार याची उत्सुकता लागली आहे.
भाजपने घराणेशाहीला ब्रेक लावण्यासाठी म्हणून लोकप्रतिनिधींच्या मुलांना, नातेवाइकांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. तर काही ठिकाणी उलटफेर होणार आहेत. पण भाजपने आज ए.बी. फॉर्म दिलेल्या उमेदवारांमध्ये अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी न देता त्यांच्या मुलांना उमेदवारी दिली आहे.यामध्ये नीलिमा खाडे यांचा मुलगा अपूर्व खाडे, ज्योत्स्ना एकबोटे यांची कन्या डॉ. निवेदिता एकबोटे, कविता वैरागे यांचा मुलगा प्रसन्नजित वैरागे, राजश्री शिळीमकर यांची मुलगी सिद्धी शिळीमकर, त्याच प्रमाणे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांनाही पक्षाने संधी दिली आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भारतभूषण बराटे या २७ वर्षाच्या तरुणालाही संधी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु