
रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात ३१ डिसेंबर व नववर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची ये-जा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक सुरळीत राहणे व अपघात टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता तसेच संबंधित कायद्यांन्वये जड व अवजड वाहनांस वाहतूक बंदी लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
सदर वाहतूक बंदी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजल्यापासून बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत खारपाडा–कशेडी, माणगाव–ताम्हिणी घाटमार्गे दिघी–कर्जत–पळसदरी–खोपोली–पाली फाटा–वाकण, वडखळ–अलिबाग चौकफाटा–कर्जत राज्यमार्ग, अलिबाग–मुरुड राज्यमार्ग तसेच अलिबाग–मांडवा महामार्ग या मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रतिबंधित राहील.
रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने नाताळ व नववर्षाच्या सुट्यांमध्ये मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली व रायगड किल्ला आदी पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
सदर वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलीस वाहने यांना लागू राहणार नाही. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके