
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रसारित होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिराती, सोशल मीडिया प्रचार, तसेच इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन करणे बंधनकारक आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव किरण गायकवाड यांनी दिली आहे.
उमेदवार व राजकीय पक्षांकडून निवडणूक काळात पेड न्यूज, द्वेषपूर्ण मजकूर, आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या जाऊ नये, यासाठी प्रसार माध्यम व सनियंत्रण समिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून सर्व माध्यमांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. तसेच कोणतीही जाहिरात समितीच्या पूर्वप्रमाणनाशिवाय प्रसारित करू नये.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समितीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील माहिती व जनसंपर्क विभागात कार्यान्वित झाले आहे. प्रस्तावित जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनासाठी जाहिरात प्रसारित करण्याच्या विहीत वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित क्यूआर कोड सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये बॅनर स्वरूपात लावण्यात आलेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु