
कोल्हापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी सर्व निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली. ८१ नगरसेवक पदाच्या या निवडणूकीसाठी राजकिय पक्षापैकी महायुतीची यादी अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने दोन टप्प्यात यादी प्रसिद्ध करून ६५ उमेदवार निश्चित केले. उर्वरीत जागेसाठी नावे जाहीर न करता थेट एबी फॉर्म देणार असल्याचे सांगण्यात आले. इच्छुकांपैकी उमेदवारी न मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजांची संख्या अधिक झाली. त्यांनी बंडखोरी करून स्वतंत्र लढण्यासह इतर पक्ष, आघाड्या यांचा आधार घेतला. काही जणांची समजूत काढून थांबवण्यासही नेत्यानां यश आले.
महायुतीने प्रथम पासूनच नियोजन आणि सावधगिरी बाळगून व्यूहरचना केली होती. त्यामुळे सुरवातीला घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांसाठी सुरवातीला फक्त अनुक्रमे 36-30-15 असा फॉर्म्यूला नेत्यांनी ठरवून घेतला. पण नावांची यादी मात्र अखेरच्या दिवशी अखेरच्या तासात जाहिर केली. तरीही काही जणांची नाराजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमटली. अनेक कार्यकर्त्यांची पक्ष आणि नेत्यांवरील निष्ठा ढळल्याचे स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीचे संपूर्ण नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी केले. त्यांच्याकडून उमेदवारीची चर्चा करताना घटक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरवातीला आप त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार हे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आणि या तिन्ही पक्षानी मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.. शिवसेना ठाकरे गटाचीही केवळ 7 जागांवर बोळवण झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच महविकास आघाडीत बेबनाव झाला. त्याचे पडसाद अखेरच्या क्षणापर्यंत पडत राहीले.
अखेरच्या टप्प्यात आ. विनय कोरे यांच्या जनसुराज्यशक्ती पक्षाने कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात उडी घेतली आणि 30च्या वर इच्छुकांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील फूट ही आप, वंचीत, राष्ट्रवादी श.प. ची तिसरी आघाडी आणि जनसुराज्यशक्ती पक्षाची एन्ट नाराज उमेदवारांसाठी आधार ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar