
लातूर, 30 डिसेंबर, (हिं.स.)। 2025 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यातील 04 कोटी 63 लाख 95 हजार रुपयाची मालमत्ता हस्तगत तर अवैध धंद्यावर कार्यवाही करत 12 कोटी 63 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. तसेच खुनाच्या गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा उलगडा.
लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि क्लिष्ट तसेच गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास करणे, हे कोणत्याही सक्षम पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. या दृष्टीने लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch – LCB) ही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, गुन्हेगारीविरोधात एक प्रभावी, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा म्हणून ओळखली जाते.
एलसीबी ही केवळ तपास करणारी शाखा नसून, ती पोलीस प्रशासनाचा “तिसरा डोळा” आणि गुन्हेगारीविरोधातील मुख्य अस्त्र मानली जाते. गुन्हे घडल्यावर तपास करण्यासोबतच गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यातही ही शाखा अग्रभागी आहे.
१. स्थानिक गुन्हे शाखेची रचना.
स्थानिक गुन्हे शाखा ही थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. या शाखेत निवडक, अनुभवी, प्रशिक्षित व तांत्रिक ज्ञान असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात येते. लातूरसारख्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरी व ग्रामीण जिल्ह्यात, वाढती लोकसंख्या, वाहतूक, व्यापार आणि सीमावर्ती भाग लक्षात घेता एलसीबीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
२. आधुनिक व तांत्रिक कार्यपद्धती.
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यपद्धती ही पारंपारिक तपास पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो. त्यामध्ये
🔹 तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) मोबाईल व सीसीटीव्ही संदर्भातील डिजिटल पुरावे, फुटेज, डिजिटल ट्रेल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.
🔹 सायबर इंटेलिजन्स.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सोशल मीडिया मॉनिटरिंग, डिजिटल व्यवहारांचा अभ्यास आणि ऑनलाइन व्यवहारांचे विश्लेषण करून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात येते.
🔹 मोडस ऑपरेंडी (MOB) अभ्यास_
सराईत गुन्हेगारांच्या जुन्या गुन्ह्यांच्या नोंदींचा अभ्यास करून त्यांच्या विशिष्ट पद्धती (MO) ओळखल्या जातात व त्यावरून नवीन गुन्ह्यांचा छडा लावला जातो.
३. गुप्तचर यंत्रणा व समन्वय.
एलसीबीचे स्वतंत्र गुप्तचर जाळे संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत आहे. खबऱ्यांच्या माध्यमातून चोरी, दरोडा, अवैध धंदे आणि टोळ्यांच्या हालचालींची माहिती गोळा केली जाते. लातूर जिल्ह्याची सीमा इतर जिल्हे व कर्नाटक राज्याशी जोडलेली असल्याने, इंटर-स्टेट कोऑर्डिनेशन साधून परराज्यातील गुन्हेगार टोळ्यांचा देखील यशस्वी छडा लावण्यात येतो.
४. गंभीर गुन्ह्यांतील प्रभावी कामगिरी.
खून, दरोडा, जबरी चोरी, अमली पदार्थांची तस्करी (NDPS), संघटित गुन्हेगारी यांसारख्या गंभीर प्रकरणांचा तपास एलसीबीकडे सोपवला जातो. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या मदतीने गुन्ह्यांची व्याप्ती, आरोपींचे नेटवर्क आणि गुन्ह्याचे मूळ शोधून अल्पावधीत गुन्हे उघडकीस आणले जातात. यामध्ये प्रामुख्याने संवेदनशील खुनासारख्या 10 गुन्ह्याचा उलगडा करून 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील परप्रांतीय महिलाचा खून करून सुटकेसमध्ये भरून टाकून दिल्याच्या अतिशय क्लिष्ट व संवेदनशील खुनाच्या गुन्ह्याचा तसेच औसा पोलीस ठाणे हद्दीतील कार जळीत प्रकरणातील स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या घटनेच्या सखोल तपास करून आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
तसेच पोलीस ठाणे किनगाव हद्दीतील बहुचर्चित दरोडा प्रकरणातील आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेने सन 2025 मध्ये
1)जबरी चोरीचे 03 गुन्हे उघड करून 16 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.
2) घरफोडीचे 81 गुन्हे उघड करत 54 लाख 26 हजार 823 रुपयाचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
3) 111 चोरीचे गुन्ह्याची उकल करून तब्बल 03 कोटी 77 लाख 72 हजार 751 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
4) बाहेर जिल्ह्यातील 32 चोरीचे गुन्हे उघड करून 14 लाख 29 हजार 976 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एकंदरीत दरोडा, घरफोडी, जबरी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा कौशल्य पूर्वक तपास करून त्यांच्या छडा लावून 04 कोटी 63 लाख 95 हजार 550 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
५. अवैध व्यवसाय व गुन्हेगारी निर्मूलन.
गेल्या वर्षांत एलसीबीने—
1)अवैध जुगार च्या 115 केसेस करून सहा लाख 63 हजार 945 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
2)गावठी हातभट्टीची दारू च्या 286 केसेस करून 7 लाख 9 हजार 875 रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.
3)गुटखा व तंबाखू तस्करी करणाऱ्यावर 38 गुन्हे दाखल करून 01 कोटी 52 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
4)अवैध वाळू उपसा करणाऱ्या वर 46 गुन्हे दाखल करून 09 कोटी 59 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
5)अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या वर 09 गुन्हे दाखल करण्यात आले असून 30 लाख 96 हजार 875 रुपयाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. यामध्ये दोन गुन्ह्यात आरोपीकडून 95 ग्राम मेफ्राडोन ड्रग्स (एमडी) जप्त करण्यात आले आहे.
एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष मोहिमा राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करत 549 गुन्हे दाखल करून 12 कोटी 63 लाख 55 हजार 623 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
तसेच अवैधरित्या शस्त्र बाळगणारे लोकांवर कारवाई करत त्यांचे विरुद्ध 6 गुन्हे दाखल करत त्यांचे कडून 7 गावठी कट्टे जप्त केले आहे.
६. प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती.
गुन्हे घडू नयेत यासाठी सण-उत्सवांच्या काळात कोंबिंग ऑपरेशन, संशयितांची धरपकड, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड, पॅरोलवरील गुन्हेगारांवर पाळत अशा प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतात. यामुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
२०२५ मधील प्रतिबंधात्मक कारवायांची सविस्तर आकडेवारी.
१) एमपीडीए (MPDA – Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) सन २०२५ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत ०२ सराईत व धोकादायक गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कायद्याचा उपयोग प्रामुख्याने वाळू तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध व्यवसाय तसेच सातत्याने कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध केला जातो.
एमपीडीए अंतर्गत कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे अशा गुन्हेगारांच्या हालचालींना कायमस्वरूपी आळा घालणे. या कायद्यानुसार संबंधित आरोपींना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाते, ज्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी साखळीला मोठा फटका बसतो.
२) मकोका (MCOCA – Maharashtra Control of Organised Crime Act)
संघटित गुन्हेगारी ही समाजासाठी सर्वात मोठी आणि घातक समस्या ठरत आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे हिंसक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लातूर पोलिसांनी मकोका कायद्याचा प्रभावी वापर केला आहे.
सन २०२५ मध्ये एकूण २० आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना दीर्घकाळ जामीन मिळणे कठीण होते, त्यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे.ही कारवाई म्हणजे केवळ गुन्हेगारांवर कारवाई नसून, संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा ठोस संदेश असल्याचे स्पष्ट होते.
३) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई.
गुन्हा घडण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा आधुनिक पोलीस व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने लातूर पोलिसांनी BNSS अंतर्गत पुढीलप्रमाणे प्रस्ताव सादर केले आहेत –कलम १११ अंतर्गत: ०७ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून कलम ११२ अंतर्गत: १३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना वेळेत आळा घालण्यास मदत होत आहे.
४) हद्दपारी / तडीपार कारवाई – गुन्हेगारांवर कडक कारवाई.
स्थानिक परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या, वारंवार गुन्हे करणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी ही प्रभावी कारवाई आहे.
जनतेचा सहभाग – यशाची गुरुकिल्ली.
एलसीबीच्या यशामागे जनतेचा विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचा आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन आहे की, आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध व्यवसाय किंवा गुन्ह्याची माहिती असल्यास तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा ही केवळ तपास करणारी यंत्रणा नसून, ती जिल्ह्याच्या सुरक्षेचे मजबूत कवच आहे. शिस्तबद्ध कार्यपद्धती, तांत्रिक कौशल्य, गुप्तचर माहिती आणि जनतेच्या सहकार्याच्या बळावर पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे सखोल मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त, सुरक्षित व शांततामय ठेवण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis