
जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.) एकीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही तास राहिले असताना महायुतीमध्ये (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गट) जागावाटपाचा गोंधळ कायम राहिला आला आहे. अशातच महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलीय. जळगाव महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
जळगाव मनपाच्या एकूण ७५ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळाल्या असून, पक्ष या जागांवर महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले. महायुतीमधील जागावाटपाची अंतिम आकडेवारी जुळली असून तासाभरात याची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितले जात आहे.हॉटेल रॉयल पॅलेस येथे भारतीय जनता पक्षातर्फे आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. यात भारतीय जनता पक्षाला ४६ शिवसेनेला २३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत.
या बैठकीनंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, जळगाव महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविली जाणार आहे. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत. या जागांवर आमचे उमेदवार निवडणूक लढवतील. मात्र, महायुतीचे इतर दोन घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) नेमक्या किती जागांवर लढत आहेत, याची अधिकृत माहिती मला नाही.” महायुतीच्या फॉर्मुल्याबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याची माहिती असून त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळाले ते देखील थोड्याच वेळात कळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर