अमरावती : भातकुलीतील कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला भीषण आग
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे असलेल्या कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने फॅक्टरीतील साठवलेला संपूर्ण कापूस जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी
भातकुलीतील कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला भीषण आग संपूर्ण कापूस जळून खाक; कारण अद्याप अस्पष्ट


अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे असलेल्या कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने फॅक्टरीतील साठवलेला संपूर्ण कापूस जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून, मोठ्या प्रमाणात पाणी फवारून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कापूस असल्याने आग पटकन पसरत असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आग आटोक्यात आल्यानंतर पंचनामा करून तपास केला जाणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली आहे.दरम्यान, घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande