नाट्य रसिकांनी घेतली १५ जानेवारीला १०० % मतदान करण्याची शपथ
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भय
नाट्य रसिकांनी घेतली १५ जानेवारीला १०० % मतदान करण्याची शपथ


पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाट्य रसिकांनी घेत येत्या १५ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार केला.पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 'अथर्व सुदामे लाईव्ह…' या नाट्यप्रयोगाच्या वेळी मतदान जनजागृती उपक्रम जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य असल्याचा संदेश देत नाट्य रसिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ यावेळी घेतली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नाट्यप्रेमींनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त करत आगामी महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करण्याचा निर्धार केला.मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणारा हा उपक्रम प्रेक्षकांनी विशेष कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande