अलिबागच्या विकासासाठी विरोधक सज्ज; शपथविधीने राजकीय वातावरण रंगले
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आज राजकीय घडामोडींना गती प्राप्त झाली. भाजपाचे अँड. अंकित बंगेरा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पती-पत्नी श्वेता पालकर व संदीप पालकर यांनी अलिबाग नगरपालिकेत नगरसेवक पदाचा
अलिबागच्या विकासासाठी विरोधक सज्ज; शपथविधीने राजकीय वातावरण रंगले


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आज राजकीय घडामोडींना गती प्राप्त झाली. भाजपाचे अँड. अंकित बंगेरा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पती-पत्नी श्वेता पालकर व संदीप पालकर यांनी अलिबाग नगरपालिकेत नगरसेवक पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.

नगरपालिकेच्या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते आणि २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निकालानुसार शेकापक्षाला १७ जागांवर वर्चस्व मिळाले, तर विरोधकांनी काही प्रभागांमध्ये कडव्या संघर्षानंतर विजय संपादन करून आपली उपस्थिती ठसठशीतपणे नोंदवली. निवडणुकीत शिवसेना (उबठा)ला २ आणि भाजपला १ जागा मिळाल्या.

शपथविधीच्या कार्यक्रमात शिवसेना (उबठा) व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारताना समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.विरोधकांचा हा विजय नगरपालिकेतील चर्चांना व निर्णय प्रक्रियेला वेगळी दिशा देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी सभांमध्ये जनहिताचे प्रश्न, विकासकामे तसेच प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधकांची भूमिका अधिक आक्रमक राहील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

अँड. अंकित बंगेरा यांनी सांगितले, “अलिबागच्या विकासासाठी पारदर्शक कारभार, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नागरिक-केंद्रित निर्णय हे आमचे प्राधान्य असेल. मूलभूत सोयी, स्वच्छता, वाहतूक आणि पर्यटनविकास यांचा समतोल साधून शहराला आधुनिक स्वरूप देऊ.” अँड. श्वेता पालकर म्हणाल्या, “महिलांचे प्रश्न, सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले जाईल. नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडवून आणण्यास कटिबद्ध आहे.” अँड. संदीप पालकर यांनी स्पष्ट केले की, “सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे यावर भर देऊ.” या शपथविधीनंतर अलिबागच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याचे संकेत दिसून येत आहेत, आणि विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande