
रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक २९ रोजी पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या एकूण ७८ जागांसाठी महायुतीतील जागावाटप जाहीर करण्यात आले असून त्यानुसार भाजपला ७१ जागा, शिवसेना (शिंदे गट) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ आणि आरपीआय (आठवले गट) १ जागा देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे प्रमुख निरीक्षक आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवदास कांबळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीतील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुती एकसंघपणे निवडणूक लढवून पनवेल महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार महेश बालदी यांनी माहिती देताना सांगितले की, मंगळवार दिनांक ३० जानेवारी रोजी महायुतीतील सर्व अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. निवडणूक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने लढवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, जागावाटपानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून बंडखोर उमेदवार महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. बंडखोरी रोखण्यात महायुतीचे नेतृत्व कितपत यशस्वी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके