
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : भारत सरकार वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार निष्क्रिय ठेव रक्कम विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या देवरूख येथे सोमवारी, दि. 29 डिसेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात झालेल्या जनजागृती व मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
शिबिरास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रबंधक बेनझिर शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बँक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांनी निष्क्रिय ठेवी टाळण्यासाठी रि-केवायसी व खात्यास नामनिर्देशन आवश्यक असल्याचे सांगितले. बँकिंग कायद्यातील अलीकडील सुधारणांनुसार एका खात्यासाठी चार व्यक्तींपर्यंत नामनिर्देशन करता येते, अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी कुटुंबातील प्रलंबित दावे असल्यास संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
दहा वर्षांहून अधिक कालावधीसाठी वापरात नसलेल्या ठेवी म्हणजे निष्क्रिय ठेव रक्कम आहे. त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये वर्ग केल्या जातात आणि योग्य कागदपत्रांसह खातेदार किंवा वारसदारांना परत मिळू शकतात.
देवरूखच्या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निष्क्रिय ठेव प्राप्त झालेल्या विविध लाभार्थ्यांना त्यांच्या बँकांमार्फत प्रशस्तीपत्र देण्यात आले. शिबिराचे आयोजन बँक ऑफ इंडियाच्या देवरूख शाखेने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन दर्शन दत्ताराम कानसे यांनी केले.
या कार्यक्रमात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आरडीसीसी बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँक तसेच इन्शुरन्स कंपन्यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी