
सोलापूर, 30 डिसेंबर, (हिं.स.)। सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची मुदत असून ३ जानेवारीपासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी सायबर पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे. उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टरवर पथक लक्ष ठेवून आहे.
सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस उपनिरीक्षक, पाच हवालदार असे सहा जणांचे विशेष पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात, ज्यांच्या पोस्ट आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त असतात त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोणीही दोन जातिधर्मांत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह मेसेजवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. दररोज या विशेष पथकांकडून वादग्रस्त व्यक्तींचे प्रोफाइल तपासले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड