
सोलापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूरसह कर्नाटक, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. सोलापूर बाजार समितीत ५३५ गाड्या कांद्याची आवक होती. दिलासादायक बाब म्हणजे, दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी कांद्याचा दर ३०० रुपयांची वधारला होता. कांद्याला प्रतिक्विंटल किमान १३०० ते कमाल ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.संक्रांत, पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी कांदा घेऊन ठेवतात. सणामुळे ते काही दिवस गावाकडेच असतात. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर देखील कांद्याचा भाव सोमवारी वाढल्याचे दिसून आले.
बंगळूर बाजारात कांद्याला १८०० ते ३९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. विकलेल्या कांद्याचे पैसे लगेचच मिळतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा बंगळूरला नेत आहेत. सोलापूर बाजार समितीत देखील समाधानकारक भाव मिळत असल्याने आवक वाढली आहे.मागील दहा दिवसांत चार हजारांहून अधिक गाड्यांची आवक सोलापूर बाजार समितीत राहिली आहे. सकाळी १० वाजता लिलावाला सुरवात होते. विशेष बाब म्हणजे, सोलापूर बाजार समितीत मुख्य व्यापाऱ्याअंतर्गत (गाळेधारक) अनेकजण कांद्याचा व्यवहार करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड