
सोलापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भूकंपसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी उमटलेल्या ‘दासरी हटाव’च्या नाऱ्यानंतर, सायंकाळपर्यंत पक्षाच्या जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उपसल्याने खळबळ उडाली आहे. अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा उद्रेक झाल्याने सोलापुरात मशाल विझण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जिल्हाप्रमुख संतोष पाटील, पदाधिकारी बाळासाहेब गायकवाड, युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे यांनी राजीनामा दिला. शिवसेनेत काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू होता. आज सकाळी नाराज इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत ‘दासरी हटाव’चा जोरदार नारा दिला.या आंदोलनानंतर पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. या वादाचे पर्यवसान थेट राजीनामा सत्रात झाले. जिल्हाप्रमुख संतोष पाटील आणि युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे यांच्यासारख्या सक्रिय नेत्यांनी पद सोडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड