
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : प्रत्येक व्यक्ती म्हणजे ग्राहक असते. त्यामुळे ग्राहक पंचायतीची चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांचे भरीव योगदान असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महावितरणचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय तांबे यांनी केले.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आज, दि. ३० डिसेंबर रोजी पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक पंचायतीने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. खेडशी, खंडाळा येथील स्पर्धांपाठोपाठ रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातही स्पर्धा झाली. तिचे बक्षीस वितरण आज झाले. त्यानिमित्ताने बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजय तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेखणी हे हत्यार वापरून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी ग्राहक पंचायतीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे, असेही सांगितले.
जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी विविध उदाहरणे देऊन ग्राहकांनी जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले. समारंभाला ग्राहक पंचायत जिल्हा संघटक उमेश आंबर्डेकर, कोषाध्यक्ष दीपक साळवी, सदस्य दिलीप कांबळे, ज्येष्ठ शिक्षक संदीप कांबळे उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी केले. निबंध स्पर्धेतील विजेत्या शमिका विजय बोले (बारावी वाणिज्य ब), भूमिका औदुंबर आडाव (बारावी वाणिज्य अ) आणि स्वराली योगेश पानगले (अकरावी वाणिज्य -अ) या तीन विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती वृंदाली गुरव यांचाही गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चव्हाण यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी