जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अमरावतीत महायुती कोलमडली
अमरावती, 30 डिसेंबर, (हिं.स.) अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी आणि निर्णायक घडामोड घडली आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद अखेर टोकाला पोहोचले असून, शिवसेना शिंदे गटाने महानगरपालिकेच
जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अमरावतीत महायुती कोलमडली शिवसेना शिंदे गट सर्व ८७ जागांवर स्वबळावर मैदानात


अमरावती, 30 डिसेंबर, (हिं.स.) अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी आणि निर्णायक घडामोड घडली आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद अखेर टोकाला पोहोचले असून, शिवसेना शिंदे गटाने महानगरपालिकेच्या सर्व ८७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री संजय राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, भाजपकडून कुठलाही दगा-फटका किंवा अन्याय झालेला नाही; मात्र जागावाटपाच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी आणि न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली होती. हीच भावना लक्षात घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राठोड म्हणाले, “महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, ही आमच्या वरिष्ठ नेत्यांची सुरुवातीपासून भूमिका होती. त्यासाठी अनेक बैठका, चर्चा आणि वाटाघाटीही झाल्या. मात्र शेवटपर्यंत जागावाटपाचा प्रश्न सुटू शकला नाही. आमचे कार्यकर्ते हट्टी आणि आग्रही आहेत. त्यांना योग्य संधी न मिळाल्यास नाराजी वाढते, संघटन कमजोर होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना आणि संघटनेचे भवितव्य लक्षात घेऊन स्वबळाचा मार्ग स्वीकारणे अपरिहार्य ठरले.”अमरावती महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेतृत्व तयार असून, त्यांना न्याय देण्यासाठीच सर्व ८७ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही केवळ निवडणूक लढवत नाही, तर प्रत्येक प्रभागात सक्षम, लोकांशी जोडलेले उमेदवार देणार आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपबाबत बोलताना राठोड यांनी समन्वयाची भूमिका ठेवली. “भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे आणि भविष्यातही तो मित्रपक्षच राहील. स्थानिक पातळीवर राजकीय स्पर्धा असली, तरी ती मैत्रीपूर्णच असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोपांची धार मर्यादित राहील, असा संकेतही त्यांनी दिला.

महायुतीत झालेल्या या तुटीमुळे अमरावती महानगरपालिका निवडणूक आता बहुरंगी आणि अधिक चुरशीची होणार आहे. शिवसेना शिंदे गट स्वबळावर उतरल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली असून, त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. एकीकडे भाजप, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि इतर विरोधी पक्ष यांच्यातील लढत कशी रंगते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ज्या जागा मागितल्या होत्या, त्या मिळाल्याच नाहीत - कॅप्टन अभिजीत अडसूळ

अभिजीत अडसूळ म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने ज्या जागा मागितल्या होत्या, त्या आम्हाला मिळाल्याच नाहीत. पण, जेवढी संख्या पाहिजे, त्यापैकी केवळ ३० टक्केच जागा देण्यात आल्या. ज्यावेळी आम्ही बैठकीमध्ये चर्चा करीत होतो, तेव्हाच लक्षात आले की, ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक गेल्यावेळी निवडून आले होते, ती जागा भाजपने शिंदे गटाला सोडलेली दाखवली, पण या जागांवर युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांनी संपूर्ण तयारी केल्याचे दिसले आणि त्याचे पोस्टर, बॅनर्स आमच्यापर्यंत पोहचले. ही पारदर्शी युती होणार नाही, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande