
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्यविषयक कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यशाळेत एकूण ७५ विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उच्च शिक्षणातील विविध करिअरच्या संधींबाबत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सविस्तर सादरीकरण केले.
डॉ. सागर संकपाळ यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या मूलभूत विज्ञान शाखांमधील विविध करिअरच्या संधींचे विश्लेषणात्मक पद्धतीने माहिती दिली. प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्रात डॉ. अमित वराळे, डॉ. रणजित बनसोडे, डॉ. हेमंत चव्हाण व प्रा. प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहितीसह प्रात्यक्षिके दाखविली. विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रयोगांचे हँड्स-ऑन ट्रेनिंगदेखील देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रयोगशाळा कौशल्ये अधिक मजबूत झाली.
कार्यशाळेच्या आयोजनात काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कोकणी, प्रा. शिरसाट, प्रा. नटे आणि प्रा. शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कार्यशाळेच्या शिस्तबद्ध आयोजन आणि समन्वय यासाठी खास परिश्रम घेतले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयातील उत्सुकता, प्रयोगशाळेतील कौशल्ये आणि उच्च शिक्षणाबद्दलची जाणीव वाढण्यास मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी